हा प्रसंग घडला होता साधारण 15 वर्षांपूर्वी .स्थळ होतं जपान मधील टोकियो शहर .अमेरिकन क्लब. परदेशी नागरिकांच्या बायकांसाठी हा क्लब खूप काम
करतो.
आम्ही जपान मधील इंग्लिश भाषेबद्दल बोलू लागलो .नंतर विषय अमेरिकेतील भाषेकडे वळला . ह्या विषयावर बार्बरा खूप अधिकाराने बोलत होती . तिला अमेरिकेतील स्पॅनिश वापराचा खूप राग येत होता .ती म्हणत होती प्रत्येक ठिकाणी आम्ही स्पॅनिश फलक का वाचायचे ? प्रत्येक वेळेस जपानी, चीनी ,स्पॅनिश भाषांना का महत्व द्यायचे ?
हेल्प लाईन ला एक साधा फोन करायचा असेल तर इंग्लिश पर्यंत पोहोचण्यासाठी तिला दहा भाषांना पार करून जावे लागते ,अमेरिकन सरकारच्या भाषाविषयक धोरणावर तिचा आक्षेप होता .इंग्लिश सोडून त्या इतर भाषांना दिलेलं महत्व तिला पटत नव्हते . तिला काळजी होती कि तिच्या पुढच्या पिढीला सक्तीने स्पॅनिश भाषा शिकावी लागेल . बार्बरा बोलत होती आणि तिच्या आवाजाला धार येत होती . ती पुढे म्हणाली आम्ही कर भरतो आणि त्यापैशाने सरकार भाषाविषयक भावना जपतं .
तिची मैत्रीण सुद्धा ह्याला विरोध दर्शवित होती . परंतु तिला त्यात गैर वाटत नव्हते .
आमच्या शेजारी स्वीडन ची एक जण होती .ती त्या विषयावर भावूक झाली . तिच्या देशात ती स्वीडिश , जर्मन ,इंग्लिश आणि फ्रेंच शिकलीय . तिला थोडीफार नॉर्वेजियन आणि फिनिश भाषा सुद्धा येते . कारण हे देश तिच्या देशाच्या जवळचे होते . म्हणून त्या भाषा ती शिकली .मात्र तिच्या मुलांना तिची स्वीडिश भाषा येत नाही . म्हणजे ते मातृभाषेत सरावलेले नव्हते . त्यांना इंग्लिश स्वतःची भाषा वाटते . तिने हे सत्य स्वीकारले आहे पण ती या बाबतीत दुःखी आहे .
टोकियोच्या अमेरिकन क्लब मध्ये आम्ही ४ देशांच्या स्त्रिया स्वतःच्या मातृभाषेबद्दल बोलत होतो .
आता माझी वेळ आली . कसा कोण जाणे माझ्यात एकदम आत्मविश्वास संचारला .मी आत्मकथा सांगायला सुरुवात केली. "मी मुंबईकर , मराठी माझी मातृभाषा .हिंदी आमची राष्ट्र भाषा ?! ( याबद्दल वाद आहेत. मला स्वतःला दक्षिण भारतीय भाषा आवडतात) . "
त्यावर एक जण म्हणाली कित्ती बरे न .हिंदी बोलले कि सर्व भारतीयांशी तुम्ही जोडला जात असाल ? मी म्हटले नाही . इथे मी अनेक भारतीयांना भेटले ज्यांना हिंदी येत नाही आणि ते हे झुरळ झटकल्या सारखे करतात. म्हणजे बॉलीवूड सिनेमे पहिले जातात आवडीने पण हिंदीला तुच्छ समजले जाते .
तिथे मला त्या सर्वांना सांगता हि येत नव्हते कि आम्ही सर्व प्रथम स्थानिक असतो आणि मग जमलं तर पूर्ण भारतीय .
" युनायटेडली डिफरन्ट ".
भाषा हि आमच्यासाठी प्रश्न नसून अस्मिता आहे .
तीव्र अस्मिता !
टोकियो फिल्म फेस्टिवल मध्ये सुद्धा मला हे जाणवलं होतं .
"चक दे " तिथे दाखवला गेला तर जपानी माणसांना हे कळतच नव्हते कि वेगळ्या स्टेट मधून आल्याने काय बिघडतं?
जेवणाच्या टेबलवर मी त्या सर्वांना म्हटले भाषा म्हणजे आमच्यासाठी भावनिक प्रश्न आहे . जो आम्ही अत्यंत रांगडेपणाने हाताळतो . टोकदार पणाने .
आनंदी काळापासून आलेला हा वाद . वर्तुळाच्या आतील आणि बाहेरील.जे तुमच्याकडे तेच आमच्या कडे . फक्त आम्ही अजून विकसित देश आहोत म्हणून आमचे एजेस रफ आहेत.
भारतात माणसांना जोडण्यासाठी भाषा आहे आणि तोडण्यासाठी सुद्धा भाषाच आहे . तुमचे आमचे सेम च आहे . "
( मला मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी,मारवाडी भाषा समजतात. तेलुगु भाषा शिकतेय सद्या)
#internationalmotherlanguageday
#crossculture #Linguisticempathy #sulawrites #marathi
No comments:
Post a Comment